४० वर्षीय व्यक्तीविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा; १ हजार रोख व निरोधाचे पाकीट जप्त

अंबाजोगाई प्रतिनिधी : –शहरातील पिताजी सारडा नगरी, सेलू रोड परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये अनैतिक व्यापार सुरू असल्याच्या माहितीवरून अंबाजोगाई शहर पोलिसांनी धडक कारवाई केली. रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.२५ वाजता करण्यात आलेल्या या कारवाईत दोन महिला आढळून आल्या. याप्रकरणी परभणी जिल्ह्यातील ४० वर्षीय व्यक्तीविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ मधील कलम ३, ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, संबंधित व्यक्ती परभणी जिल्ह्यातील डेबेवाडी येथील रहिवासी आहे. कारवाईदरम्यान आढळून आलेल्या दोन महिलांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून ५०० दराच्या दोन नोटा, अशी एकूण १,००० रोख रक्कम तसेच मॅनफोर्स कंपनीचे निरोधाचे एक पाकीट जप्त केल्याचे कागदपत्रात नमूद आहे.
पोलिसांच्या आरोपानुसार, संबंधित व्यक्ती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे कारवाईत निष्पन्न झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अंबाजोगाई शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील अनैतिक व्यवसायांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलल्याचे दिसून आले आहे.
गुन्हा दाखल करण्याची कारवाई अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलीस निरीक्षक जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
