कळंब प्रतिनिधी : तालुक्यातील खामसवाडी येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत्याने आपल्या २० वर्षीय पुतण्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवार (दि.१८) रोजी रात्री घडली. सुजित ज्ञानेश्वर शेळके असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
आरोपी विलास शिवाजी शेळकेचा आई-वडिलांशी जमिनीवरून वाद सुरू होता. १८ एप्रिल रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला आणि आरोपी आपल्या वृद्ध आई-वडिलांना मारहाण करू लागला.यावेळी बाजूलाच राहणारा त्यांचा नातू सुजित शेळके हा आजी-आजोबांना वाचवण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करायला गेला. याचा आरोपीला राग आला. आरोपी विलास सुजितला म्हणाला की, ‘तुला मी जमीन देणार नाही, तू जास्त माजलास का? तुझा काटाच काढतो’ अशी धमकी देत सुजितच्या पोटात चाकू खुपसला. गंभीर जखमी झालेल्या सुजितचा यामध्ये मृत्यु झाला. मृताची आई मनीषा ज्ञानेश्वर शेळके यांच्या फिर्यादीवरून आरोपी विलास शेळके विरुद्ध शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आई-वडिलांना एकुलता एक मुलगा गेल्याने शेळके कुटुंबाचा आधार हिरावला असून, गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, घटनास्थळी फॉरेन्सिक टीम पाचारण करण्यात आली होती.उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार यांनीही घटनास्थळाला भेट दिली. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने समाजमन सुन्न झाले.
