अंबाजोगाई प्रतिनिधी :
लातूर जिल्ह्यातील एका कुटुंबासाठी आनंदाचा क्षण ठरलेली घटना समोर आली असून, तब्बल आठ वर्षांपासून हरवलेला तरुण अखेर पोलिसांच्या तांत्रिक तपासाच्या मदतीने शोधण्यात यश आले आहे. अंबाजोगाई शहर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सत्यम महादेव हुडगे (वय २१, मुळगाव – लातूर जिल्हा) हा तरुण अंबाजोगाई येथे अभियांत्रिकी शिक्षणासाठी वास्तव्यास होता. मात्र शिक्षणात लक्ष न लागणे आणि वारंवार अपयश येत असल्यामुळे कुटुंबीयांकडून त्याला समज दिली जात होती. या पार्श्वभूमीवर त्याने आपल्या बँक खात्यातील सर्व रक्कम काढून ९ मार्च २०१८ रोजी अंबाजोगाई येथून निघून गेला. त्यानंतर त्याने कुटुंबीयांशी पूर्णपणे संपर्क तोडला होता.
या घटनेनंतर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. पोलिसांकडून सातत्याने शोधमोहीम राबवण्यात आली, मात्र त्याचा कोणताही मागमूस लागत नव्हता.
दरम्यान, २०२६ मध्ये पोलीस अधीक्षक बीड नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली हरवलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेअंतर्गत संबंधित प्रकरणाचा पुन्हा तपास सुरू करण्यात आला. बीड येथील टेक्निकल सेलच्या मदतीने पोलिसांनी तांत्रिक तपास करत त्या तरुणाचा मोबाईल क्रमांक शोधून त्याचे अचूक लोकेशन निश्चित केले.
पोलिसांनी वडिलांशी सतत संपर्क ठेवून त्यांना आवश्यक माहिती व मार्गदर्शन दिले. त्यांच्या अचूक समन्वयामुळे वडिलांना थेट दिल्ली-गाझियाबाद येथे पोहोचणे शक्य झाले.
तपासात समोर आले की, संबंधित तरुण सध्या दिल्ली-गाझियाबाद परिसरात भागीदारीत कुरिअर व्यवसाय करत असून, त्याने तेथेच विवाहही केला आहे. वडील तेथे पोहोचल्यानंतर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली मुलाचा शोध लागला आणि तब्बल आठ वर्षांनंतर बाप-लेकाची भावनिक भेट घडून आली.
या प्रकरणाचा यशस्वी पाठपुरावा पोलीस निरीक्षक शरद जोगदंड व पोलीस हवालदार पांडुरंग काळे यांनी केला. हरवलेला मुलगा सुखरूप मिळाल्याने कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले असून, या कामगिरीबद्दल अंबाजोगाई पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचे आवाहन :
सध्याच्या काळात शिक्षणाचा वाढता ताण, अपयशाची भीती आणि पालक व विद्यार्थ्यांमधील कमी होत चाललेला संवाद यामुळे मुलांमध्ये मानसिक तणाव वाढत आहे. अशा परिस्थितीत घर सोडून जाण्याच्या घटना वाढत असल्याने पालकांनी मुलांशी संवाद वाढवणे, त्यांना समजून घेणे आणि संयम राखणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
