बीड प्रतिनिधी : कथित भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकच्या अडचणी आणखीच वाढल्या आहेत. भूसंपादन घोटाळा प्रकरणात झालेली अटक आणि त्यानंतर मिळालेली कोठडी यामुळे राज्य शासनाने अविनाश पाठकवर अखेर निलंबनाची कारवाई केली आहे.
बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कथित भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणी दाखल गुन्ह्यात ७ मे रोजी बीडचे माजी जिल्हाधिकारी म्हणून राहिलेल्या अविनाश पाठकला अटक करण्यात आली होती. बीडच्या न्यायालयाने सुरुवातीला अविनाश पाठकला पोलीस कोठडी सुनाववली तर सध्या पाठक न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. आता सनदी अधिकाऱ्याला कोठडी सुनावण्यात आल्याने राज्य शासनाने पुढील कारवाई केली असून अविनाश पाठकच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. हे निलंबन अटकेच्या तारखेपासून असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून निलंबनकाळात अविनाश पाठकचे मुख्यालय बीड असणार आहे. या कारवाईमुळे पाठकला आणखी एक धक्का बसला आहे.
